Gadchiroli Murder | कुऱ्हाडीने वार करून १७ वर्षीय मुलाचा निर्घृण खून, मित्रानेच काढला मित्राचा काटा!

आरोपीही अल्पवयीन, गांजा ओढण्यास बोलावून साधला डाव, गडचिरोली-गुरवळा मार्गावरील जंगलातील थरारक घटना
Gadchiroli Murder
Gadchiroli Murder
Published on
Updated on

गडचिरोली : क्षुल्लक कारणावरुन मनात राग धरुन एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचा कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून केला. २७ मेच्या भरदुपारी गडचिरोली-गुरवळा मार्गावरील जंगलात ही थरारक घटना घडली.

बादल नकटू कोसनकर (१७) रा.डोंगरगाव, ता.गडचिरोली) असे मृत मुलाचे आहे. आज (ता.२८) सकाळी गुरवळा नदी परिसरातील जंगलात एका मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

असा लावला पोलिसांनी छडा

फिर्यादी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या बोलण्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर मोबाईल चॅटिंग, तांत्रिक तपास व अन्य बाबींच्या आधारावर अवघ्या काही तासांतच फिर्यादी मुलगाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

गांजा ओढण्यास बोलावून केला घात

दोन दिवसांपूर्वी मृतक बादल कोसनकर याने आरोपीच्या बहिणीबद्दल अपशब्द वापरले. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले. राग मनात ठेवून आरोपीने बादलचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने बुधवारी दुपारी बादलला गांजा ओढण्यास बोलावून गुरवळा परिसरातील जंगलात नेले. काही वेळाने दोघेही घरी जाण्यास निघाले. मात्र, बादल पुढे जात असताना आरोपीने मागून त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला. डोक्यावर वार केल्याने बादलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुरुवातीला आरोपीने प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी खोटी फिर्याद देऊन अन्य दोन अनोळखी तरुणांचा सहभाग असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी अल्पावधीतच खुनाचा छडा लावला. पोलिस उपनिरीक्षक पूजा नैताम व प्रवीण बुंदे घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news