

Gadchiroli Animal Parts Smuggling
गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या वन्यजीव विभागाने संयुक्त कारवाई करीत वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघाची हाडे आणि दोन खवले मांजर जप्त करण्यात आले आहेत.
वन्यप्राण्यांची शिकार करुन त्यांचे अवयव विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकांना मिळाली होती. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी अवयव खरेदी करणारे ग्राहक बनण्याची शक्कल लढवून सापळा रचला. त्यांनी तस्करांशी संपर्क करुन अवयव खरेदीसंदर्भात बोलणं केलं. ठरल्याप्रमाणे अधिकाऱ्यांना आलापल्ली-सिरोंचा मार्गावर एका ठिकाणी बोलावण्यात आले.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास संबंधित अधिकारी नियोजित स्थळी पोहचून ते विक्री करणाऱ्या तस्करांची वाट बघत होते. बाजूलाच अन्य अधिकारी आणि कर्मचारीही दबा धरुन होते. काही वेळानंतर तीन दुचाकींवरुन सहा जण तेथे पोहोचले. त्यांची तपासणी करताच ते तस्कर असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी सहाही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाघाचे काही अवयव आणि दोन जिवंत ख्वले मांजर जप्त करण्यात आले. सहाही जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि छत्तीसगडमधील उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या घटनेमुळे वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.