

Gadchiroli Land Acquisition Protest
गडचिरोली : प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपिक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील १४ गावांतील हजारो स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी गुरूवारी (दि.२१) रखरखत्या उन्हात चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी साधूबाबा कुटी येथून मोर्चास प्रारंभ झाला. 'सुपिक जमीन वाचवा,एमआयडीसी हद्दपार करा, शेतजमीन देणार नाही,' अशा घोषणा देत शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तेथे सभा घेण्यात आली.
या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, मनोज पोरटे, कॉ.अमोल मारकवार, कुंदा जुवारे, पवन गेडाम आदींनी संबोधित करुन शासनाच्या धोरणाचा कडाडून विरोध केला. शासनाने सुपिक शेतजमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल्, असा इशारा वक्त्यांनी दिला.
भेंडाळा परिसरातील जमीन अत्यंत सुपिक असून, हजारो शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शेतीशिवाय दुसरे साधन नाही. जमीन अधिग्रहीत केल्यास शेतकरी भूमिहीन होऊन त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होईल, अशा भावना व्यक्त करीत शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत जमीन न देण्याचा निर्धार केला. त्यानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांना निवेदन देऊन जमीन अधिग्रहण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.
यापूर्वी केले होते मुंडन आंदोलन
महिनाभरापूर्वी शेकडो शेतकऱ्यांनी संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मुंडन आंदोलन केले होते. परंतु प्रशासन जमीन अधिग्रहण करण्यावर ठाम असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.