

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील ६० हून अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना लाहेरी व भामरागड शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत वर्ग असून, सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज सकाळी लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील जवळपास ६० विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना तत्काळ लाहेरी येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, २२ मुले व १८ मुली अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, त्यातील दोघांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्यामागे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहायक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आश्रमशाळेतील अन्य विद्यार्थ्यांचीही आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. लाहेरी व भामरागडमध्ये भरती विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना रुग्णालयातून आश्रमशाळेत नेण्यात येत आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचं कारण कळेल, असे भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी सांगितले.