

Gadchiroli Nephew Kills Uncle
गडचिरोली : 'चिडचिड कमी कर, शांत राहण्याचा प्रयत्न कर' असा सल्ला देणे काकाला महागात पडले. काकाने दिलेला सल्ला अपमान असल्याचे समजून तापट स्वभावाच्या पुतण्याने झोपेत असलेल्या काकावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. ५ मेच्या मध्यरात्री कोरची तालुक्यातील मुलेटीपदीकसा या गावात ही थरारक घटना घडली.
पुनाराम बैसाकू धुर्वे (६५) असे मृत काकाचे, तर रामनाथ श्यामराव धुर्वे (२०) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे.
रामनाथ धुर्वे हा मोलमजुरी करण्यासाठी कनार्टक राज्यातील बंगळुरू येथे गेला होता. चार महिन्यांपूर्वी तो गावाकडे आला. अधूनमधून रामनाथचं डोकं दुखत असल्याने त्याने डोकेदुखीवर चांगले उपचार करणारा डॉक्टर कोण आहे, अशी विचारणा त्याने काका पुनाराम धुर्वे याच्याकडे केली होती. पुनारामने त्याला औषधी तर घे, पण चिडचिड कमी करून शांत राहण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला दिला. मात्र, काकाचा हा सल्ला रामनाथला अपमानकारक वाटला. तेव्हापासून तो काकाबद्दल मनात राग धरून होता.
५ मेच्या रात्री काका पुनाराम नेहमीप्रमाणे शेतातील झोपडीत झोपण्यासाठी गेला होता. रात्री रामनाथ कुऱ्हाड घेऊन शेतावर पोहोचला. काका गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने काकाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. यामुळे पुनारामचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रामनाथने कुऱ्हाड तेथेच फेकून पळ काढला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कोरची पोलिसांनी संशयाच्या आधारावर आरोपी रामनाथ यास त्याच्या घरातून अटक कली.