Gadchiroli hevay rain | गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू, रपटा वाहून गेला, दोन ट्रक फसले!

जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची जोरदार हजेरी, वाहतूक खोळंबली
Gadchiroli hevay rain | गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू, रपटा वाहून गेला, दोन ट्रक फसले!
Published on
Updated on

गडचिरोली : बुधवारी १ जुलैच्या संध्याकाळी जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या अखिल बिस्वास(५५),(रा.विकासपलली) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. बोरी-आलापल्ली मार्गावरील मुत्तापूर येथील नाल्यावरील तात्पुरता रपटा मुसळधार पावसामुळे वाहून गेला, तर चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील पोहार नदीच्या पुलाजवळच्या पोचमार्गावरील चिखलात फसून दोन ट्रक उलटले.

काल दक्षिणेकडील भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी इत्यादी तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. चामोर्शी तालुक्यातील रेगडीनजीकच्या कन्नमवार जलाशयात विकासपल्ली येथील अखिल बिस्वास, दीपक बिस्वास, निर्मल बिस्वास व चंद्रशेखर मंडल हे मासेमारीसाठी गेले होते. त्याच सुमारास पाऊस सुरु झाल्याचे चौघांनीही झाडाचा आश्रय घेतला. मात्र, एवढ्यात झाडावर वीज कोसळल्याने चौघेही जखमी झाले. त्यांना रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अखिल बिस्वास हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना घोट येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

बोरी-आलापल्ली मार्गावरील मुत्तापूर येथील नाल्यावर रपटा वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली होती. अहेरी आगाराच्या बसेसना मुलचेरामार्गे अहेरीला जावे लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडेही पडल्याचे दिसून आले. अशातच आज चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील पोहार नदीच्या पुलाजवळच्या पोचमार्गावर चिखलात फसल्याने दोन ट्रक उलटले. मात्र, प्राणहानी झाली नाही.

सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात

आज संध्याकाळी पुन्हा विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ७२.७ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यात ३१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वात कमी ०.७ मिलिमीटर पाऊस मुलचेरा तालुक्यात पडला. दरम्यान, आज दिवसभर सर्वत्र ढगाळ हवामान होते. सकाळी व संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news