

गडचिरोली : रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून नंतर सोडून दिल्याचा मोबदला म्हणून ट्रॅक्टर मालकाकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (ता.२४) कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत कोहका उपक्षेत्राचा वनपाल नरेंद्र सीताराम तोकलवार(५७) यास
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता इसम ट्रॅक्टरद्वारे रॉयल्टीसह घरकुल बांधकामाकरिता रेतीची वाहतूक करतो. अलीकडेच रेतीची वाहतूक करताना वनपाल नरेंद्र तोकलवार याने ट्रॅक्टर पकडला आणि सोडूनही दिला. ट्रॅक्टर सोडल्याचा मोबदला म्हणून आणि पुढे सुरळीतपणे रेतीची वाहतूक करु देण्यासाठी वनपाल नरेंद्र तोकलवार याने ट्रॅक्टर मालकास २५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तो २० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुराडा येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाजवळ सापळा रचला असता शुक्रवारी संध्याकाळी वनपाल नरेंद्र तोकलवार यास तक्रारकर्त्याकडून २० हजारांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर पुराडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तोकलवार याच्या पुराडा येथील निवासस्थानाची, तर चंद्रपूरच्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील तोकलवारच्या मूळ घराची झडती घेतली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजाळकर, पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.