

Flood Relief Farmers
गडचिरोली : जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाने १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जून ते सप्टेंबर २०२५ या पहिल्या टप्प्यात २१ हजार ४९५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यासाठी पहिल्या टप्प्यातील १५ कोटी ६३ लाख १२ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी १५ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये इतका निधी थेट जमा करण्यात आला आहे.
याचबरोबर शासनाने प्रति हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यास ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी सध्या १३ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे, तर आक्टोबर २०२५ मधील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ६२१ शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार सात हजार पंचेचाळीस हेक्टरवरील शेत पिकाचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्यात येत आहेत.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा झाली नसेल, त्यांनी विलंब न लावता तातडीने संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असल्यास किंवा बँक खाते नोंदीत नसून निधी परत गेला असल्यास, त्वरित आवश्यक कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे.