

Gadchiroli Etapalli Road Car Bike Collision
गडचिरोली : एटापल्लीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या आलदंडी गावाजवळ गुरूवारी (दि.४) कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. अनिल हिचामी (वय २८) असे मृताचे, तर बालाजी दुर्वा (दोघेही रा.परसलगोंदी,ता.एटापल्ली) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
अनिल हिचामी आणि बालाजी दुर्वा हे दोघे दुचाकीने एटापल्लीवरून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, आलदंडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एमएच ३४ सीडी ०८०० क्रमांकाच्या भरधाव इनोव्हा क्रिस्टा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.
या भीषण अपघातात अनिल हिचामी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या बालाजी दुर्वा यास तातडीने एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला प्रथमोपचार करून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच आलदंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अनिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, आलदंडी पोलीस पुढील तपास करत आहेत. तालुक्यात सातत्याने वाढणाऱ्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.