Gadchiroli Tigress Captured | चार नागरिकांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात चार नागरिक ठार
Tigress Trapped In Gadchiroli
Tigress Trapped In GadchiroliPudhari
Published on: 
Updated on: 

Tigress Trapped In Gadchiroli

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. शुक्रवारी (दि.१३) पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ‘जी-२५ एसएफ’ अशी ओळख असलेल्या तीन वर्षांच्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर तिला कसनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले.

जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. १७ ऑगस्ट रोजी दोलंदा येथील ५७ वर्षीय शेतकरी हरी वड्डे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी इरपनपल्ली येथील ७० वर्षीय बिलाशी आनंद बा ही महिला शेतात धान कापत असताना वाघाने त्यांना ठार केले. २५ ऑक्टोबरला शेजारच्या धानोरा तालुक्यातील तुडमेल येथील शांताराम मडावी या युवा शेतकऱ्याचाही वाघाने बळी घेतला. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी दिंडवी येथील ६८ वर्षीय सदाशिव दुग्गा हेही वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. सलग चार नागरिकांचा बळी गेल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Tigress Trapped In Gadchiroli
Gadchiroli News | वैरागड किल्ल्याच्या विहिरीत पडून पहारेकऱ्याचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. गुरूवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विशेष रेस्क्यू टीमचे प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे आणि त्यांचे सहकारी तसेच कसनसूर परिसरात दाखल झाले. अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मोहिमेला यश आले. 'जी-२५' वाघिणीला जेरबंद करण्यात आल्याने जारावंडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे, भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक दीपक रामटेके, ए.के.मडावी, वनपरिक्षेत्राधिकारी नगराळे तसेच ताडोबा येथील रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.