

गडचिरोली : दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोहउद्योग उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचा करार झाला आहे. यामुळे गडचिरोली जिल्हा भविष्यात स्टील हब बनेल, असा विश्वास राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर अॅड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविशांत पंडा, खासदार डॉ.नामदेव किरसान,आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. या करारामुळे लोह उद्योगाला चालना मिळून हा जिल्हा भविष्यातला ‘स्टील हब’ बनेल, असा विश्वास जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात रेल्वे, विमान आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जयस्वाल यांनी पोलिस दलाच्या माओवादाविरोधी कारवाईचे कौतुक केले.याप्रसंगी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला.