

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अनुसुचित जाती, जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज (दि.२१) आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा, चामोर्शी, मुलचेरा आदी तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली येथे आज सकाळी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी एकत्र आले. त्यानंतर दलित आणि आदिवासी समाजातील अनेक कार्यकते गोळा झाले. आझाद समाज पार्टीचे कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले. त्यांनी शहरातून रॅली काढून बाजारपेठ बंद करायला लावली. शहरातील शाळाही बंद होत्या. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले.
अनुसुचित जाती व जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजात फूट पडून पुन्हा गुलामगिरीत ढकलले जाईल आणि सर्वांना एकत्र आणून गुलामगिरी नष्ट करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांना खीळ बसेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच केंद्र सरकारने संसदेत कायदा पारित करावा, असे वक्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात प्रा. भास्कर मेश्राम, मुनिश्वर बोरकर, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, अॅड. राम मेश्राम, विलास कोडापे, गुलाबराव मडावी, राज बन्सोड, माधवराव गावळ, नागसेन खोब्रागडे, विनोद मडावी, आनंद कंगाले, तुळशीराम सहारे, हंसराज दुधे, कुणाल कोवे, मिलिंद बाबोंळे, मंदीप गोरडवार, नरेश महाडोरे, सुरेश कन्नमवार, सुधीर वालदे, विद्या कांबळे, रेखा कुंभारे, कुसुम आलाम, भारती मडावी, ममिता हिचामी, मालती पुडो, आरती कोल्हे, विद्या दुगा, मीनल चिमूरकर, सुखदेव वासनिक, अरविंद वाळके, प्रफुल्ल आंबोरकर, यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आजचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी नव्यानेच स्थापन झालेल्या आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेऊन शाळा बंद ठेवण्याची विनंती केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात शहरातून मोटारसायकल रॅली काढून बाजारपेठ बंद करायला लावली. या रॅलीत जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी, नागसेन खोब्रागडे, प्रितेश अंबादे, पुरुषोत्तम रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.