

Dhanora Student Death Snakebite
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी (दि.९) मध्यरात्री घडली. दीपिका लकडा (वय १२), सुष्मिता मंडल (वय १४) आणि अनू कोरेटी (वय ८) अशी मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत.
जपतलाई येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी रविवारी रात्री जेवण केल्यानंतर झोपी गेले. रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे कळताच सर्वजण खळबळून जागे झाले.
त्यानंतर दंश झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने धानोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि आठवीत शिकणारी सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनू कोरेटी हिनेही प्राण सोडला.
सध्या पाचव्या वर्गात शिकणारी दीपिका मडावी (११), सहावीतील कविता किरंगे (१२) आणि आठवीतील समृद्धी नैताम (वय १४) या तीन विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती गंभीर असून, इतर १५ विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेबद्दल सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आणि जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमी विद्यार्थिंनींना औषधोपचाराची कुठलीही कमतरता भासू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून, नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालय, तसेच नागपुरातील उपायुक्त कार्यालयातील पथके आज घटनास्थळी दाखल होऊन सविस्तर चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जपतलाई येथील अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा ही काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या संस्थेद्वारे संचालित केली जाते. या शाळेतील वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग नाहीत. त्यामुळे घटनेच्या विद्यार्थिनी खालीच गाद्या अंथरुन झोपल्या होत्या. परंतु विषारी सापाने दंश केल्याने तिघींना प्राण गमवावा लागला.
या शाळेत इतर मुलभूत सुविधांचाही अभाव आहे. आजच्या घटनेबद्दल आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. शिवाय माजी मंत्री मारोतराव यांचे पुत्र विश्वजित कोवासे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपल्या संस्थेकडे लक्ष द्यावे,अशी टीकाही बन्सोड यांनी केली आहे.