

गडचिरोली : गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील छत्तीसगड राज्यातील बांदे वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या कातड्यासह अटक केलेल्या दोन जणांपैकी पोलिस शिपाई असलेल्या आरोपीच्या घरातून दुर्मिळ खवल्या मांजराच्या शरीराचे अवशेष आढळून आले आहेत.
बिजेश्वर गेडाम असे कॉन्स्टेबलचे, तर बाबूराव मडावी असे होमगार्डचे नाव आहे. ३० जूनच्या मध्यरात्री छत्तीसगड राज्यातील पश्चिम भानुप्रतापपूर वनमंडळाच्या पथकाने मोटारसायकलमधून वाघाच्या कातड्याची तस्करी करीत असताना दोघांना पकडून अटक केली. त्यातील दोन्ही आरोपी हे अहेरी येथील रहिवासी आहेत. त्यापैकी बिजेश्वर गेडाम हा अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात शिपाई, तर दुसरा आरोपी बाबूराव मडावी हा होमगार्ड आहे. बुधवारी १ जुलैला न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वाघाच्या कातड्याच्या तस्करीत सहभागी असलेला आरोपी पोलिस शिपाई बिजेश्वर गेडाम याच्या अहेरी येथील पोलिस वसाहतीतील निवासस्थानाची आलापल्ली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडती घेतली असता तेथे दुर्मिळ खवल्या मांजराचे ५ किलो खवले आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी ते जप्त करुन छत्तीसगडच्या वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले, असे आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वनाधिकारी एस.जी.पवार यांनी सांगितले.
या तस्करीत आंतरराज्यीय साखळी असल्याचे धागेदोरे वनाधिकाऱ्यांना सापडले आहेत. साखळीतील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. जप्त केलेले वाघाचे कातडे छत्तीसगडच्या बस्तर परिसरातील इंद्रावती-अबुझमाड व्याघ्र अधिवासातून मिळाल्याचा संशय आहे. गडचिरोली, इंद्रावती, अबुझमाड, उदंती-सीतानदी आणि ओडिशातील सुनाबेडा अभयारण्य यांना जोडणारा हा वन्यजीव मार्ग असून, तो वाघ, हत्ती, गवा, रानम्हैस व इत वन्यजिवाच्या मुक्त संचारासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजिवांची अवैध शिकार व तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध वनविभाग यापुढेही कारवाई करीत राहील, असे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.