

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथील ६० वर्षीय महिलेच्या खून प्रकरणाची गडचिरोली पोलिसांनी उकल केली असून, संदीप रावजी टेकाम (३५, रा. नारायणपूर चक क्र. २, ता. चामोर्शी) यास अटक करण्यात आली आहे. तांत्रिक पुरावे, जखमांचे बारकाईने केलेले निरीक्षण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचून हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला.
५ सप्टेंबर रोजी गोपिकाबाई रामचंद्र गायकवाड या शेतात गेल्या होत्या. संध्याकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोध घेतला असता, शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि घोट पोलीस मदत केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपास पथके तयार करण्यात आली होती.
तपासादरम्यान सहायक पोलीस अधीक्षक हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण केले. जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या दिशेने तपास करताना पोलिसांनी मयत महिलेचे कौटुंबिक संबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संदीप टेकाम याच्यावर संशय व्यक्त केला.
चौकशीदरम्यान जुना वाद आणि पूर्ववैमनस्यातून गोपिकाबाईंना काठीने मारहाण करून व दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी संदीप टेकाम यास अटक करण्यात आली. चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि घोट येथील तपास पथकाचे कौतुक केले आहे.