

गडचिरोली, : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे अवैध उत्पादन व साठवणूक करणाऱ्या आरोपींविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाई केली. गट्टा (फु.) पोलिसांनी चार आरोपींना अटक करून सुगंधित तंबाखू, उत्पादन व पॅकिंग साहित्य तसेच चारचाकी वाहन असा एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अजित जोहन कुजूर, साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे अशी अटकेतील आरोपींची नावे असून, प्रशांत याडावार हा फरार आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (फु.) येथील पोलिस पथकाने धानोरा तालुक्यातील जांभळीझोरा, येथील अजित जोहन कुजूर याच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा तसेच पॅकिंगसाठी लागणारे साहित्य आढळून आले. परिसरात उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यातही सुगंधित तंबाखूचा साठा आढळला.
पोलिसांनी सुगंधित तंबाखूच्या १०३ पांढऱ्या रंगाच्या पिशव्या, अतिरिक्त चार पिशव्यांमधील तंबाखू, हुक्का शिशा तंबाखूचे पॅकेट, बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटिक फिल्म सीलिंग मशीन, पोर्टेबल बॅग शिलाई मशीन, स्ट्रेटनर मशीन आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून गट्टा (फु.) पोलिस मदत केंद्रात संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित कुजूर, साईनाथ कन्नाके, सचिन कन्नाके आणि अभिजित नान्हे या चार आरोपींना २० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. गडचिरोली येथील प्रशांत याडावार हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी. आणि सहायक पोलिस अधीक्षक सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दयानंद भोंबे करीत आहेत.