

Naxal Affected Families Government Jobs
गडचिरोली : नक्षलवादामुळे यातना भोगाव्या लागलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून घेत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली. आज या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आजवर पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयातून शेकडो निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. या पीडित कुटुंबांतील एका सदस्यास शासन सेवेत सामावून घेण्यासाठी शासन निर्णयान्वये तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पूर्वी निरसित करण्यात आलेली २९ शिपाई संवर्गाची पदे पुनर्जीवित करून घेतली.
या प्रयत्नांचे फलित म्हणून आज नक्षलपीडित कुटुंबातील २९ उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर रुजू होण्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
शासनसेवेत प्रवेश मिळालेली ही संधी केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याची संधी आहे. सेवेत कार्यरत असताना नियमांचे काटेकोर पालन, जनतेप्रती संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यावेळी म्हणाले. तसेच, सेवेत रुजू होताना आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी नवनियुक्त सर्व २९ कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, आस्थापना शाखेचे तहसीलदार सचिन जयस्वाल तसेच नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते.