

गडचिरोली : येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांची तत्काळ बदली करावी, या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी आजपासून नागपूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून आरोग्य क्षेत्रात अनेक समस्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभार, रुग्णांना होणारा त्रास, दिव्यांग विभागातील व्यवस्था तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध बाबींवर पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. डॉ. लहाडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात काही डॉक्टरांनीही नाराजी व्यक्त करून राजीनामा दिल्याचा दावा अमिता मडावी यांनी केला आहे.
डॉ.लहाडे यांच्या विरोधातील तक्रारींची आरोग्य उपसंचालकांच्या चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीमुळे १५ जुलैपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतरही कारवाई न झाल्याने ७ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर अमिता मडावी यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. डॉ.वर्षा लहाडे यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करावी आणि त्यांची गडचिरोली येथून बदली करावी, अशी मागणी अमिता मडावी यांनी केली आहे.