

Gadchiroli Airport Land Acquisition
गडचिरोली : गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येणारी भूसंपादनाची कार्यवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालकर यांनी राखी–गुरवळा येथील उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भातील १२ मे २०२६ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरवळा–राखी–हिरापूर–शिरपूर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंतची संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने संपादित करून प्रकल्प राबविण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश नाही, असे पालकर यांनी स्पष्ट केले. चर्चेतून अन्य पर्याय निघू शकतात. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार अबाधित असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर परिसरातील जमीन सुपीक व बारमाही बागायती असून, बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेती हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असल्याने विमानतळासाठी जमीन देण्यास विरोध असल्याची भूमिका ग्रामस्थांनी यावेळी मांडली.
या प्रसंगी शिवसेना नेते हेमंत जंबेवार, तहसीलदार सागर कांबळे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.