

Adapalli Steel Plant
गडचिरोली: मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतींतर्गत प्रस्तावित मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या पोलाद प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत विशेष ग्रामसभा तहकूब करण्यास भाग पाडले. सोमवारी (दि.९) आयोजित विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी सरपंचाने परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप करुन त्यास धारेवर धरले.
अडपल्ली ग्रामपंचायतींतर्गत मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लोकप्रकल्प सुरु करणार आहे. त्याअनुषंगाने विविध गावांतील शेकडो नागरिक सभेसाठी एकत्र आले होते. परंतु रविवारी (दि. ८) संध्याकाळी अचानक नोटीस लावून ग्रामसभा बोलावण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले. आम्हाला विश्वासात न घेता कंपनीसाठी जमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली.
यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत मेटास्टील कंपनीला जमीन न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. असे असतानाही नव्याने विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. ही बाब संशयास्पद असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले.
कंपनी प्रतिनिधी आणि कथित दलालांविरोधात ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. 'ग्रामस्थांच्या संमतीशिवाय जमीन देण्याचा अधिकार कुणालाही नाही', असा ठाम पवित्रा उपस्थितांनी घेतला. सभास्थळी तणाव निर्माण झाल्याने आष्टी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
ज्येष्ठ कार्यकर्ते कवडू चल्लावार म्हणाले, '४ फेब्रुवारीच्या सभेतच आम्ही कंपनीला जमीन न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही घाईघाईने ग्रामसभा बोलावण्याची गरज काय होती? आम्ही आमच्या जमिनी विकणार नाही.'
ग्रामपंचायत सदस्य संदीप चौधरी यांनीही स्पष्ट भूमिका मांडत सांगितले, 'गावातील जमीन कंपनीला देण्यास ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे. दलालीसाठी कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याला गावकरी उत्तर देतील.'