

Social Activists Protest Gadchiroli PWD
गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोरची तालुक्यातील बेतकाठी-डोलीटोला रस्ता आणि नाडेकल व कोहका या दोन गावांना जोडणाऱ्या खोब्रागडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृ्ष्ट दर्जाचे करण्यात आल्याने संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अभियंत्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले असून, आज पाचव्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरुच होते.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोरची तालुक्यातील बेतकाठी-नाडेकल-डोलीटोला या अंदाजे ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरु आहे. या कामात निकृष्ट दर्जाची गिट्टी वापरण्यात आल्याने अल्पावधीतच रस्ता फुटला आहे. शिवाय नाडेकल ते कोहका या दोन गावांना जोडणाऱ्या खोब्रागडी नदीवर दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. परंतु बांधकाम अत्यंत निकृ्ष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पूल कॉलमसह पडला आहे. पडलेला पूल लोकांना दिसू नये यासाठी कॉलम व स्लॅब वाळूने बुजविण्यात आले आहेत.
दोन्ही प्रकरणांतील कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून, पूल बांधणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित अभियंता व उपविभागीय अभियंत्यास निलंबित करावे आणि पुलाचे बांधकाम नव्याने करावे इत्यादी मागण्या योगाजी कुडवे यांनी केल्या आहेत. कुडवे यांच्याबरोबरच आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे राज्य नीळकंठ संदोकर व कोषाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम हेही ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलनाला गांभीर्याने घेतले नाही तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा योगाजी कुडवे यांनी दिला आहे.