Gadchiroli Accident |मद्यधुंद ट्रकचालकाची ट्रॅक्टरला धडक: दोन ठार, दोन गंभीर जखमी

ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत, पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
Gadchiroli Accident
ट्रॅक्टरला ट्रकची धडक: दोन ठार, दोन गंभीर तर एक किरकोळ जखमी
Published on
Updated on

गडचिरोली : ट्रकने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिल्याने दोन जण ठार, तर तिघे जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज संध्याकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास कोरचीपासून दोन किलोमीटर अंतरावरील मोहगाव फाट्याजवळ घडली. संबधित ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी त्‍याला पाठलाग करुन पकडले.

सागर कल्लो (१९), रा. झेंडेपार, ता. कोरची, कैलास कोवे (३५) रा. मोहगाव,ता.कुरखेडा अशी मृतांची, तर राजेश गंगबोईर (२८ ) रा.चमरोटोला, ता. मोहल्ला (छत्तीसगड), पुरुषोत्तम मडकाम (५१) रा. चिचोली, ता.अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया अशी जखमींची नावे असून, त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्ण्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेत प्रदीप नैताम हा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जलसंधारण विभागाच्या वतीने झेंडेपार गावाजवळ बंधाऱ्याचे काम सुरु आहे. याच कामावर चांदोना येथून सेंट्रींग घेऊन एमएच ४०-बी ९५७३ क्रमांकाच्या ट्रॅक्टर जात होता. मात्र, हैदराबाद येथून कोरचीमार्गे रायपूरकडे जाणाऱ्या सीसी ०७-बीए ९२८४ क्रमांकाच्या ट्रकने मोहगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर उलटून ४ मजूर दबले गेले, तर एक बाहेर फेकला गेला. ट्रॅक्टरचा चेंदामेंदा झाला. माहिती कळताच मोहगावचे नागरीक, तसेच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दिनेश खटोले, कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ.चेतना सिडाम, डॉ.शिव पुंडे यांनी प्रथमोपचार केले. मात्र, कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका चंद्रपूरला दुरुस्तीसाठी गेल्याने कुरखेडा येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना गडचिरोलीला हलविण्यात आले.

डोंगरगाव फाट्याजवळ मिळते दारु

डोंगरगाव फाट्याजवळ सर्रास दारु विक्री केली जात असल्याने अनेक ट्रकचालक तेथे थांबून दारु पितात आणि कोरचीमार्गे छत्तीसगडकडे रवाना होतात. परिणामी बेळगाव घाटावर बरेचदा वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत असतात. आजच्या अपघातातील ट्रकचालक अभिषेक शर्मा यास मद्यधुंद अवस्थेत कोरची पोलिसांनी पाठलाग करुन रस्त्यात पकडून अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news