Gadchiroli Accident : चामोर्शी-आष्टी मार्गावर भीषण अपघात; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक ठार

Gadchiroli Accident : चामोर्शी-आष्टी मार्गावर भीषण अपघात; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक ठार
Published on
Updated on

गडचिरोली : चामोर्शी-आष्टी मार्गावरील जामगिरी फाट्याजवळ ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक विनोद कुमरे (५७) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील अन्य तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमरे (रा. दिघोरी, नागपूर) हे आपल्या सहकाऱ्यांसोबत एका अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून टाटा इंडिका कारने आष्टीकडून चामोर्शीच्या दिशेने येत होते. दरम्यान, जामगिरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक MH 34 BZ 1337) कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याशेजारील एका झाडावर जाऊन आदळली.

उपचारादरम्यान मृत्यू

या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेल्या कुमरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कारमधील इतर प्रवासी अमोल देशपांडे (४०), कुणाल मुळके (२८) आणि योगेश वरखडे (४०) हे किरकोळ जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघातानंतर चामोर्शी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश खोब्रागडे आणि पथक या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news