

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: आरोग्य आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत पद्मश्री डॉ. अभय बंग यांना ‘भारत अस्मिता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमआयटी समूह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्यातील विश्वशांती डोम येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि अडीच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराचे संस्थापक राहुल कराड, डॉ.विश्वनाथ कराड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अभय बंग गडचिरोलीतील SEARCH (सर्च) फाउंडेशनचे संचालक आहेत. त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सुधारण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘घरोघरी नवजात बाळाची काळजी’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी बालमृत्यू दरात लक्षणीय घट घडवून आणली. त्यांच्या या कार्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन आरोग्य धोरणांचा आदर्श तयार झाला आहे.
या सोहळ्यात डॉ. सौम्या स्वामिनाथन, डॉ.भास्कर (संचालक, आयआयएम अहमदाबाद), प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि ज्येष्ठ कलाकार शेखर सेन यांनाही सन्मानित करण्यात आले. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार हा महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशन रिसर्च (MAEER) आणि एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे यांनी २००५ मध्ये स्थापित केला. देशनिर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर (२००९), पद्मभूषण डॉ.नारायण मूर्ती आणि पद्मश्री सौ.सुधा मूर्ती (२०१०) यांना प्रदान करण्यात आला होता.
या भव्य सोहळ्याला १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. प्रेरणादायी विचारवंत आणि नेतृत्वकर्त्यांसोबत संवाद साधण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली.