

गडचिरोली,: मागील २२ वर्षांपासून वनविभागाच्या विश्रामगृहांमध्ये मांसाहार करण्याची राज्य शासनाने घातलेली बंदी उठविण्याची मागणी करुन राज्याचे अर्थ व कृ्षी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी खळबळ उडवून दिली आहे.
आशिष जयस्वाल यांनी अलीकडेच वनमंत्री गणेश नाईक यांना वनविभागाच्या विश्रामगृहात मांसाहार करण्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी करणारे पत्र पाठविले आहे. आज जयस्वाल गडचिरोली येथे आले असता, यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपल्या मागणीचे समर्थन केले.
जयस्वाल म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे धोरण आणि इतर राज्याचे धोरण यात एकसूत्रता असणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील पर्यटक इतर राज्यात जातात, तेव्हा तेथे त्यांना ज्या सुविधा मिळतात; त्या महाराष्ट्रातही मिळायल्या हव्यात. इतर राज्यातील वनविभागाच्या विश्रामगृहांमध्ये मांसाहार करण्याची मुभा आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात बंदी आहे. त्यामुळे आपल्या राज्यात येणारे पर्यटक खासगी हॉटेल्सना पसंती देतात. परिणामी अर्थव्यवस्थेला फटका बसतो. यासंदर्भात काही पर्यटकांनी आपणाकडे तक्रार केली होती. त्यामुळे आपण मांसाहाराची बंदी उठविण्याची मागणी केली असून, त्याबाबत वनमंत्र्यांशी चर्चा केल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
२००४-०५ मध्ये तत्कालिन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी धोरणात्मक निर्णय म्हणून वनविभागाच्या विश्रामगृहांमध्ये मांसाहार करण्याची बंदी घातली होती, हे येथे उल्लेखनीय. परंतु आता दुसऱ्या मंत्र्यांनीच ही बंदी उठविण्याची मागणी केल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.