गडचिरोली : गैरमार्गाने ६६ लाख रुपयांची संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वडसा येथील फिरत्या वनपरिक्षेत्राचे तत्कालिन वनपरिक्षेत्राधिकारी दिवाकर रामभाऊ कोरेवार यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. कोरेवार हे सध्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाली वनआगाराचे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये दिवाकर कोरेवार व त्याच्या अधिनस्थ महिला कर्मचाऱ्यांवर १ लाख ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून कोरेवारची चौकशी सुरु होती. त्याअनुषंगाने एसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड यांना चौकशीदरम्यान दिवाकर कोरेवार याच्याकडे ज्ञात व कायदेशीर उत्पन्नापेक्षा ६६ लाख ८ हजार ४०४ रुपये अधिक आढळून आले. ही अपसंपदा ८३.०३ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी दिवाकर कोरेवार आणि ही अपसंपदा संपादित करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्या पत्नीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.20) कोरेवार याच्या गडचिरोली शहरातील रामनगर येथील घराची झडती घेण्यात आली. शिवाय पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने कोरेवार सध्या राहत असलेल्या वाडा येथील निवासस्थानाचीही झडती घेतली आहे.
एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगांबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, राजेश पद्मगिरवार, हवालदार किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली.