

गडचिरोली : शाळेमागील परिसरात शौचास गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी(ता.२७) दुपारी कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथे घडली. वेदांत शंकर पदा (वय- ८ वर्षे, रा.नवेझरी, ता.कुरखेडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
वेदांत पदा हा वडेगाव येथील क्रांतिवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता. शाळेच्या शौचालयात पाणी नसल्याने शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास तो शाळेतील एका मित्रासह शाळेमागे असलेल्या तलावाकडे शौचास गेला. परंतु तोल गेल्याने तो तलावात बुडाला. माहिती मिळताच शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तलावाकडे धाव घेऊन वेदांतला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी तो हालचाल करीत होता. त्याला तत्काळ कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, चौकशी सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले.
शाळा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
या घटनेबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, शाळा व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आश्रमशाळेतील शौचालयात पुरेशा पाण्याची व्यवस्था नसते काय?, असेल तर लहान मुलावर बाहेर शौचास जाण्याची पाळी का आली?, विद्यार्थ्यांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष नसते काय?, असे नानाविविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आदिवासी विकास विभागाने संबंधित शाळेवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.