Lok Sabha 2024 : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : माकपचा निर्णय  | पुढारी

Lok Sabha 2024 : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : माकपचा निर्णय 

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य माणसाला नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आरमोरी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय जनता पक्ष हा जनहितविरोधी पक्ष आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या राजवटीत जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाली आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपाने निवडणूक रोखे व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा करुन घेतला. त्या बदल्यात उद्योगपतींचे १५ लाख रुपये माफ केले. त्यामुळे देश कर्जबाजारी झाल्याची टीका बैठकीत करण्यात आली.

भाजप हा संविधान व लोकशाही विरोधी असल्याने त्यांचा पराभव करणे हे कम्युनिस्टांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवाराच्या विरोधात इंडिया आघाडी  जो उमेदवार उभा करेल, त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताकदीने काम करेल. तसेच आरमोरी तालुक्यात माकप स्वतः निवडणूक प्रचार कार्यालय उभारणार असल्याची माहिती माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी दिली.

Back to top button