बीआरएसपी लढविणार गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा | पुढारी

बीआरएसपी लढविणार गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी आंबेडकरी मतांचा सन्मान करीत नसल्याची टीका करीत आज बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाने (बीआरएसपी) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात आपला उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीपुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीने अद्याप आपले उमेदवार जाहीर केले नाही. अशावेळी मागील निवडणुकीत या आघाडीचा घटकपक्ष राहिलेल्या बीआरएसपीने लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बीआरएसपीचे प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की भारतीय जनता पक्ष हा भांडवलदार समर्थक व संविधानविरोधी विचार पेरणारा पक्ष असल्याने सत्तेत आल्यास लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसाठी काम केले. यावेळीसुद्धा पक्षाची तीच भूमिका आहे. परंतु महाविकास आघाडी आंबेडकरी मतांचा सन्मान करत नसेल आणि आपल्याच तोऱ्यात असेल तर २० मार्चपर्यंत पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांच्या आदेशानुसार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चर्चेसाठी दार खुले ठेवणार आहे. मात्र तसे न झाल्यास ताकदीने उमेदवार उतरविणार असल्याचे फुटाणे म्हणाले.

शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी, कामगार व विद्यार्थी यांच्याशी संबंधित मुद्द्यांना घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडे तीन-चार उमेदवार असून, नाव नंतर जाहीर करु, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शहर सचिव नागसेन खोब्रागडे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, कुणाल कोवे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक बारिकराव मडावी, उपाध्यक्ष अरविंद वाळके, निवृत्त सहायक पोलिस निरीक्षक शंकर चिंतुरी, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव शोभा खोब्रागडे, शहराध्यक्ष विद्या कांबळे,  संघटक आवळती वाळके, शहर सचिव प्रतिमा करमे, निवृत्त सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम मडावी उपस्थित होते.

Back to top button