गडचिरोली : जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३८७ कोटींचे सामंजस्य करार | पुढारी

गडचिरोली : जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३८७ कोटींचे सामंजस्य करार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आज गडचिरोली येथील हॉटेल लँडमार्क येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत ४६ कंपन्यांनी सहभाग नोंदवत ३८७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे अंदाजे २५ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा प्रशासनाद्वारे  नवउद्योजकांकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. याचा लाभ घेऊन जिल्ह्यातील युवा वर्गाने नोकरी करण्याऐवजी उद्योजक बनण्याची मानसिकता जोपासावी. जोखमीची मर्यादा निश्चित करून विक्रीची कला अवगत करावी, असा सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला.

अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग व्यवस्थापक बी.के. खरमाटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.  यावेळी पर्यटन संचालनालयाचे उप संचालक प्रशांत सवाई, ‘आत्मा’च्या अर्चना कोचरे, गाव माझा उद्योग फाउंडेशनचे संचालक पवन वानखेडे, विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे प्राध्यापक अनिरूद्ध लचके, आर.सी.ई.आर.टी.चे डॉ. मनिष उत्तरवार, व्ही.के.जी.बी.चे गजानन माद्यसवार, शेतकरी उत्पादन कंपनीचे चंद्रशेखर भडांगे, हेमंत जंबेवार यांनी या गुंतवणूक परिषदेच्या दोन सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी देविचंद मेश्राम यांनी केले. परिषदेला जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अभिषेक पाटोळे, पूनम कुसराम तसेच संबंधित अधिकारी, विविध उद्योजक, नवउद्योजक उपस्थित होते.

Back to top button