

Death of Minor Gadchiroli
गडचिरोली : आई-वडील मजुरीसाठी परराज्यात गेले असता चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आपल्या घरीच गळफास घेऊन जीवन संपविले. ही हृदयद्रावक घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे रविवारी (दि.१) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
संस्कार विनोद कन्नके (वय १०) असे मृत बालकाचे नाव आहे. संस्कारचे आई-वडील मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेले होते. त्यामुळे तो मोठ्या बहिणीसमवेत आजी-आजोबाकडे राहून शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी संस्कार बाहेरुन घरी आला. त्यानंतर काही वेळाने आजी व आजोबाचे लक्ष नसताना ओढणीने गळफास लावून घेतला. पोलिस पाटील माधुरी सहारे यांनी आरमोरी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
चौथ्या वर्गात शिकणाऱ्या संस्कारने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असावे, या प्रश्नाने सर्वांना भंडावून सोडले आहे. आई-वडील बाहेर असल्याने एकाकीपणामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, कुण्या मित्राशी भांडण झाल्याने वा शिक्षक रागावल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवली असावी, याविषयीचा उलगडा पोलिस तपासात होणार आहे. आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.