गडचिरोली: ४ ऑक्टोबरला ढिवर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Gadchiroli News
गडचिरोली: ४ ऑक्टोबरला ढिवर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाpudhari news network
Published on
Updated on

गडचिरोली: ढिवर समाजाला ६ टक्के आरक्षण द्यावे, एनटी ‘ब’ प्रवर्गात इतर जातींचा समावेश करु नये, मच्छिमार संस्थांना त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीतील तलाव द्यावे, ढिवर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करावी यासह १३ मागण्यांसाठी भोई, ढिवर व तत्सम जाती संघटनांच्या वतीने ४ ऑक्टोबरला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला भोई, ढिवर व तत्सम जाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.भाग्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष सुनील बावणे, सचिव किशोर बावणे, दुधराम सहारे, संयोजक कृष्णा मंचालवार, सल्लागार रामदास जराते, परशुराम सातार, उकंडराव राऊत, मोहन मदने, सुधाकर गद्दे, महिला अध्यक्ष मिनाक्षी गेडाम, जिल्हा सदस्य जयश्री जराते यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.

आयोजकांनी सांगितले की, राज्यात भोई, ढिवर समाज एकूण लोकसंख्येच्या सात ते आठ टक्के आहे. परंतु या समाजाचा एनटी ‘ब’ प्रवर्गात समावेश असल्याने केवळ अडीच टक्के आरक्षण मिळत आहे. ते वाढवून ६ टक्के करावे. मच्छिमारी करणे हा भोई, ढिवर समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. परंतु मच्छिमार संस्थांकडे तलाव नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे ग्रामसभांना मिळालेले तलाव मच्छिमार संस्थांना द्यावे, ढिवर समाजाला घरकुल देण्याचे प्रमाण वाढवावे, अतिवृष्टी किंवा अल्प पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मच्छिमार संस्थांना द्यावी, भोई, ढिवर समाज अशिक्षित असल्याने त्यांच्याकडे अनेक प्रमाणपत्र नाहीत. परिणामी ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे सरपंच किंवा तलाठ्याच्या दाखल्यावर त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

४ ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावरुन मोर्चा निघणार असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचेल. तेथे जाहीर सभा होईल. या मोर्चात जिल्हाभरातून दहा हजार समाजबांधव सहभागी होतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news