

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेसने अगोदर आपला पक्ष एकसंघ ठेवावा, त्यानंतर मग त्यांनी तीन पक्षांची मूठ बांधावी, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नागपुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis)
महापालिका निवडणूक असो किंवा नसो, आमचे बाराही महिने काम सुरूच असते. त्यामुळे निवडणुकांचा आणि कामाचा काही संबंध नाही, असे फडणवीस म्हणाले. बँक घोटाळा प्रकरणी छेडले असता ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात होती. त्यानंतर सगळ्या केसेस ट्रान्सफर झाल्या होत्या, सुप्रीम कोर्टाने पुन्हा हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी नागपुर कोर्टात दिले आहे, त्यामुळे लवकर निकाल होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, लव्ह जिहाद कायदा करण्यासंदर्भात महाराष्ट्रात मागणी होत आहे. अलिकडच्या काळात महाराष्ट्रात आपली ओळख लपवून लग्न करायचे, धर्मांतरण करायचे, अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. त्यामुळे कायदा केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी होत आहे. यासंदर्भात मी स्वतः सभागृहात मागच्या वेळेस घोषित केले होते की, वेगवेगळ्या राज्याच्या कायद्याचा आम्ही अभ्यास करत आहोत, त्यानंतर महाराष्ट्रात आम्ही याबाबतीत निर्णय घेऊ, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा