

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात वास्तव्यास असलेले वाघ वाघीण विविध नावांनी ओळखले जातात. याच वाघ वाघिणींचा अनेक सेलिब्रिटींना लडा आहे. त्यामुळेच ते दरवर्षी ताडोबात येऊन त्यांचे दर्शन घेतात. नुकतेच सचिन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही ताडोबात एंट्री केली आहे. आज पहिल्याच दिवशी ताडोबात सफारी केली. यावेळी तारा, माया, बिजली व काळा बिबटचे दर्शन झाले. झुनाबाईचा विशेष लडा असल्याने सचिन तेंडुलकर तीन दिवस ताडोबा मुक्कामी आहेत. त्यांच्या समवेत पत्नी अंजली तेंडूलकर व काही मित्र आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध स्थळ आहे. त्यामुळे देश-विदेशी पर्यटक या ठिकाणी येऊन वाघांचे आणि अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन घेतात. एखदा आले की दरवर्षी त्यांना वन्य प्राणी या ठिकाणी खेचून आणतात. त्यामुळेच सेलीब्रेटींची या ठिकाणी दरवर्षी सफारी होते.
क्रिकेट जगतातील देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे पत्नी अंजली व काही मित्रांसह शनिवारी काल रात्री साडेआठच्या सुमारास ताडोबात आगमन झाले आहे.
सचिन तेंडुलकर यांनी दोन दिवसांपूर्वी उमरेड जवळील करांडला मध्ये सफारी केली. त्या ठिकाणी त्यांना वाघांचे दर्शन झाले. मात्र मागील तीन वर्षांपासून झुनाबाईच्या प्रेमात असलेले सचिन तेंडुलकरचे यांनी त्या ठिकाणानंतर थेट ताडोबात एन्ट्री केली आहे. ताडोबातील व चिमूर जवळील बांबु रिसोर्टवर ते मुक्कामी आहेत. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांची ही ताडोबातील हट्रीक झाली आहे. मास्टर ब्लास्टर हे झुनाबाई नावाच्या वाघिणीचे फॅन आहेत. त्यामुळे त्यांना तिच्या बद्दल खास लडा आहे. ताडोबातील निसर्गमय वातावरण व वाघांची विविध भावमुद्रा जी ज्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना लुभावणारी असते. त्यामुळेच सिनेसृष्टी, राजकीय , क्रीडा क्षेत्र व देशविदेशातील पर्यटकांना ताडोबातील वाघ, वाघिण भूरळ घालतात. त्यापैकी सचिन तेंडुलकर एक आहेत. त्यांनी आज रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास मदनापूर गेट वरून सफारी केली. यावेळी त्यांना तारा नावाच्या वाघीणीचे तिच्या दोन बछड्यासह दर्शन झाले. तसेच अस्वल सुध्दा पहाता आले. तर त्यांनी दुपारची सफारी कोलारा गेट वरून केली. यावेळी माया नावाच्या वाघिणीचे तिच्या बछड्यासह तसेच बिजली वाघिणीने दर्शन दिले. यावेळी काळा बिबटही दिसला. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर यांना जनाबाई नावाच्या वाघिणीचा खास लडा आहे. पहिल्या दिवशी झुनाबाईचे दर्शन झाले नाही. आणि सचिन तेंडुलकरक् यांची झुनाबाईच्या दर्शनाशिवाय ताडोबाची सफारी पूर्ण होत नाही. त्यामुळे पुढचे दोन दिवस सचिन तेंडुलकर झुनाबाईच्या दर्शनासाठी ताडोबा मुक्कामी आहेत.