वर्धा : खासगी प्रवासी वाहनाचे परवाने, प्रमाणपत्र, वहनक्षमता तपासा; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा : खासगी प्रवासी वाहनाचे परवाने, प्रमाणपत्र, वहनक्षमता तपासा; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड (राजा) जवळ समृध्दी महामार्गावर खाजगी बसला भिषण अपघात झाला होता. या अपघातात अनेक प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले. त्याअनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून खाजगी प्रवासी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिवहन विभागास दिले आहेत.
खासगी बसला सिंदखेडराजा जवळ अपघात झाला. या घटनेत बसने पेट घेतल्याने त्यातील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यातील 14 प्रवाशी वर्धा जिल्ह्यातील होते. अपघाताची अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व खाजगी वाहनधारकांच्या परवान्यांची तपासणी करण्यात यावी. सोबतच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, वाहनांची वहन क्षमता, वाहनांची दुरुस्ती देखभाल आवश्यकतेप्रमाणे केली जात आहे काय तसेच प्रदुषण प्रमाणपत्राची काटेकोर तपासणी करण्यात यावी. वाहनधारकाने प्रवशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अग्निरोधक यंत्र, टुलकिट, आपत्कालीन प्रसंगी बसच्या काचा फोडण्यासाठी हातोडा तसेच रोप व प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली आहे काय याची तपासणी करण्यात यावी.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेल्या निर्देशान्वये सर्व खाजगी वाहनांची वरील प्रमाणे तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. तपासणी मोहिम कालमर्यादेत पुर्ण करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहे. भविष्यात अपघाताच्या घटना घडणार नाही यासाठी परिवहन विभागाने दक्ष राहून काम करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news