

Worker Murder in Maroda Chandrapur
चंद्रपूर : पैशाच्या वादातून दिवाणजी म्हणून काम करणाऱ्या एका युवकाची मालकानेच कोंबडे कापण्याच्या सत्तुरणे हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (दि. ११) दुपारी एकच्या सुमारास मूल तालुक्यातील मारोडा गावी घडली. शंतनु मुरलीधर येरमे (वय २६, रा. मारोडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली देत स्वतः ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
मूल तालुक्यातील मारोडा निवासी आरोपी अमित अनिल निकेसर (वय २६) याचे गावीच चिकन सेंटर आहे. तसेच त्याचा रेती पुरवठा करण्याचा सुध्दा धंदा आहे. त्याच्याकडे मृत शंतनु आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी दिवाणजीचे काम करीत होता. आज दुपारी एकच्या सुमारास पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद झाला.
चिकन सेंटर जवळ झालेला वाद वाढत गेला. वाद विकोपाला गेल्याने चिकन सेंटर मधील कोंबडया कापायच्या सत्तुरणे अमितने शंतनू वर हल्ला करून गंभीर जखमी केले. मुलाला मारहाण होत असल्याने वडील धावून गेले. आरोपीने त्यांचावर सुध्दा हल्ला केल्याने ते जखमी झाले. नागरिकांनी शंतनू आणि वडिलास मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती केले असता शंतनू याचा मृत्यू झाला. आरोपी अमित अनिल निकेसर याने स्वतः हून मूल पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण करून खुनाच्या घटनेची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.