

चंद्रपूर: सावित्रीच्या निष्ठेचा आणि वटवृक्षाच्या पवित्रतेचा संगम असलेली वटपौर्णिमा, यावर्षी मोहर्ली वनपरिक्षेत्रात एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने साजरी करण्यात आली. निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या दिवशी महिला वनरक्षकांनी वटवृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणाचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमाचे नेतृत्व महिला वनरक्षक आरती आईटलावार (वनरक्षक, मोहर्ली-I) यांनी केले. त्यांच्या पुढाकाराने सुमैया सिद्धिकी (वनरक्षक, देवाडा), टीना काळे (वनरक्षक, पद्मापूर ), शितल चौधरी (वनरक्षक, पद्मापूर), माया बुरडकर (वनरक्षक, चिचोली) यांच्यासह अन्य वनकर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात वटवृक्ष रोवले.
यावेळी संजय जुमडे (क्षेत्र सहाय्यक, मोहर्ली), सुरेंद्र मंगाम (वनरक्षक, सितारामपेठ) आणि विखुल जनबंधू (वनरक्षक, मुधोली) यांनीही सहभाग नोंदवून या स्तुत्य उपक्रमाला पाठबळ दिले. या ५० वटवृक्षांची लागवड करण्यात आली असून, केवळ वृक्षारोपण नव्हे तर त्यांच्या सजग जतन व संगोपनाची जबाबदारीही यावेळी वनकर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे.
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, समृद्धी आणि निसर्गस्नेही जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. या वृक्षाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले, अशी कथा आजही समाजमनात जिवंत आहे. महिला वनरक्षकांचा हा उपक्रम केवळ एक परंपरेचे पालन नसून, भविष्यासाठी हरित वारसा जपण्याचा एक भावनिक आणि जबाबदारीने भरलेला प्रयत्न आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या या वनपरिवाराचा हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.