Chandrapur News : वरोऱ्यात ६.५१ कोटींच्या टाऊन हॉलच्या भिंतींना तडे!

निकृष्ट कामाचा संतोष पवार यांचा आरोप
Chandrapur News : वरोऱ्यात ६.५१ कोटींच्या टाऊन हॉलच्या भिंतींना तडे!
Chandrapur News : वरोऱ्यात ६.५१ कोटींच्या टाऊन हॉलच्या भिंतींना तडे!
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : वरोरा शहरात नगर परिषदेकडून उभारण्यात येणाऱ्या टाऊन हॉल व शॉपिंग सेंटरच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरून आता वाद निर्माण झाला आहे. अंदाजे ६ कोटी ५१ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष संतोष सुरेश पवार यांनी केला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या भिंतींना वास्तुपूजनापूर्वीच तडे गेल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत असून, या प्रकरणाची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वरोरा नगर परिषद क्षेत्रात शहराच्या विकासाच्या दृष्टीने टाऊन हॉल आणि शॉपिंग सेंटरचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पातील नव्याने उभारलेल्या भिंतींवर ठिकठिकाणी तडे दिसून येत असल्याचा दावा संतोष पवार यांनी केला आहे. बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भिंतींना तडे जाणे ही चिंतेची बाब असून, संबंधित ठिकाणी तडे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी ते अद्याप स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे बांधकामाची मजबुती, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या तांत्रिक गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक इमारतीच्या बाबतीत सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.

या प्रकरणी संतोष पवार यांनी २३ नोव्हेंबर रोजी नगर परिषद वरोराचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांना लेखी निवेदन दिले. बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत स्वतंत्र तपासणी करून संपूर्ण कामाची तांत्रिक पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बांधकामात वापरलेल्या सिमेंट, विटा व अन्य साहित्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी करावी. प्रत्यक्ष बांधकामाची गुणवत्ता, तांत्रिक निकषांचे पालन आणि कामातील संभाव्य अनियमितता यांची निष्पक्ष तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांनाही पाठविण्यात आली असून, हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता नगर परिषद प्रशासन या आरोपांची कितपत गंभीर दखल घेते, बांधकामाची स्वतंत्र तपासणी होते का आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते का, याकडे वरोरा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये गुणवत्तेशी तडजोड होणे सहन केले जाणार नाही. सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित केला जाऊ नये. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य कारवाई करावी; अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,”

नगरसेवक संतोष पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.