वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक: ८ उमेदवारांचे अर्ज दाखल; भाजपचे अरुण लाखानी, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल रिंगणात

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक: ८ उमेदवारांचे अर्ज दाखल; भाजपचे अरुण लाखानी, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल रिंगणात
Published on
Updated on

चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज प्रमुख राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ८ नामांकन अर्ज प्राप्त झाले असून, भाजपचे अरुण लाखानी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यात मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत.

९७७ मतदार ठरवणार भवितव्य

वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण ९७७ मतदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले प्रतिनिधी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

उमेदवारांची स्थिती

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेशकुमार प्रेमकिशोरजी अग्रवाल यांनी चार नामांकन अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण हनुमंत लाखानी यांनी तीन अर्ज सादर केले आहेत. याव्यतिरिक्त सुधीरचंद दौलतचंद कोठारी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून एक नामांकन अर्ज दाखल केला आहे. अशा प्रकारे एकूण ८ अर्जांची नोंदणी झाली आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

आज उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही प्रमुख पक्षांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसच्या वतीने विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत अपेक्षित असली, तरी अपक्ष उमेदवाराच्या प्रवेशामुळे गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता नामांकन अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. विदर्भातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या मतदारसंघातील निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news