

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांना मिळालेल्या यशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने चंद्रपूर शहराचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप करत, त्याचा बदला जनतेने मतपेटीतून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेने काँग्रेस आणि मित्रपक्षांवर विश्वास ठेवून आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपच्या शहरातील कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली. “भाजपने चंद्रपूर शहराचा बट्ट्याबोळ केला. त्याचा बदला जनतेने या निवडणुकीत घेतला आहे. महाविकास आघाडीला जनतेने पाठिंबा दिला असला, तरी विशेषतः काँग्रेस आणि मित्रपक्षांना जनतेने आशीर्वाद दिले आहेत,” असे वडेट्टीवार म्हणाले. मतदारांनी काँग्रेसवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. “या शहरात आपण विश्वास ठेवला, त्या विश्वासाला जनतेने मतांच्या माध्यमातून बळ दिले,” असेही त्यांनी नमूद केले.
आघाडीच्या संख्याबळावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “आमची नैसर्गिक आघाडी पप्पू देशमुख यांच्यासोबत होती. त्यांच्यासह तीन नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले दोन नगरसेवकही आमच्याच सोबत आहेत. सध्या आमच्याकडे ३२ नगरसेवक आहेत.”
ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. इतर काही नगरसेवकही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे एकूण आकडा ४० ते ४२ पर्यंत जाईल. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि सत्तास्थापनेत कोणतीही अडचण येणार नाही,” असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आमचे १६ आमदार असले, तरी चंद्रपूर, लातूर, भिवंडी, अमरावती आणि अकोला येथे आम्हाला चांगले यश मिळाले आहे. सत्ता, सरकारी यंत्रणा, पैसा आणि मतदारयादीतील घोळ याविरोधात आम्ही ही निवडणूक लढवली. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. जनतेने काँग्रेसला पाठिंबा दिला असून, पुढील वाटचालीसाठी आम्हाला मोठे बळ मिळाले आहे,” असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या यशाचा विश्वास व्यक्त केला.