

चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीच्या पुरामुळे किन्ही येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे किन्ही उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तत्काळ गांगलवाडी उपकेंद्रातून पर्यायी पुरवठा सुरू करून १२ ते १३ गावांचा अंधारात जाण्याचा धोका टाळण्यात आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा परिणाम किन्ही येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रावर झाला असून, पाण्याखाली गेल्यामुळे ते उपकेंद्र तत्काळ बंद करण्यात आले. या उपकेंद्रातून सुमारे १२ ते १३ गावांना नियमित वीज पुरवठा करण्यात येत होता. या अचानक परिस्थितीत वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपले जीव धोक्यात घालून अनुचित घटना टाळण्यासाठी वीजपुरवठा बंद केला. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. प्रशासनाने तत्काळ हालचाल करत गांगलवाडी येथील ३३ केव्ही उपकेंद्रामार्फत वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू केला आहे.
या संकटकाळात वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता दिनेश हनवते आणि गांगलवाडी शाखेतील कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेत गावातील नागरिकांना दिलासा दिला आहे. पूरस्थिती असूनही त्यांच्या प्रयत्नांमुळे गांगलवाडी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. या कामगिरीमुळे वीज वितरण कर्मचाऱ्यांचे गावकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे.