

चंद्रपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक, आणि नोकरदार वर्गाला न्याय देणारा, तसेच भारताच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प मांडणारा आहे, असे मत भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्याकरिता येथील एन. डी. हॉटेल येथे भाजपातर्फे आज शनिवारी (दि.15) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुनगंटीवार यांनी प्रत्येक मुद्यावर सखोल प्रकाश टाकला.
यावेळी भाजपा नेते राहुल पावडे, विजय राऊत, डॉ मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह, किरण बुटले, प्रज्वलंत कडू, सूरज पेदुलवार यांची उपस्थिती होती. मुनगंटीवार म्हणाले, हा अर्थसंकल्प देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणारा आहे. शेतकरी वर्गासाठी, विशेषतः कापूस उत्पादकांसाठी, 05 वर्षांचे पॅकेज, कापूस उत्पादक मिशन, आणि स्वस्त व्याजदरावर 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच, अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांना उद्यमी म्हणून प्रोत्साहन देण्याच्या संकल्पामूळे महिला विकासाला चालना मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थसंकल्पातील विविध विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला. अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींवर त्यांनी विश्लेषणात्मक भाष्य केले. केंद्र शासन पर्यटनला चालना देण्यासाठी 50 पर्यटनस्थळ विकसीत करणार आहे. त्यात ताडोबा असावा म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी काय मिळाले..? यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, केंद्र शासनाची राज्यावर कृपादृष्टी आहे. मुंबई मेट्रोसाठी 1255.06 कोटी, पुणे मेट्रोसाठी 699.13 कोटी, एमयुटीपी : 511.48 कोटी, एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे 4004.31 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प 683.51 कोटी, महाराष्ट्र एग्रीबिझनेस नेटवर्क 596.57 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 295.64 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धन 229.94कोटी, ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प186.44 कोटी बजेट मधून 50 वर्षाचा बिनव्याजी कर्ज पायाभूत सुविधांसाठी, कापसाच्या नवीन मिशनचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार अशा घोषणा करण्यात आल्या आहे. हा डबल इंजिन सरकाचा इफेक्ट आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.