

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीत वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या दोन इसमांना शुक्रवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून तीन मृत जंगली डुक्कर, बंदूक, दारुगोळा आणि इतर शिकारसामग्री जप्त करण्यात आली आहे.
दिनांक १८ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी-आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचण्यात आला. त्या दरम्यान मोपेड वाहनावरून शिकार केलेल्या वन्य प्राण्यांची चोरटी वाहतूक करणारे इसम कुंदनसिंग शेरसिंग भुराणी (वय ३१) व विजयसिंग सुरतसिंग भुराणी (वय २१, दोघेही रा. पेठ वार्ड, ब्रम्हपुरी) यांना पकडण्यात आले.
त्यांच्या ताब्यातून ३ मृत जंगली डुक्कर, एक भरमार बंदूक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व इतर शिकारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या. आरोपींविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण अधिनियम व भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे आणि प्रदीप मडावी यांनी कारवाई केली.