Tiger Entry Govindpur | गोविंदपूर गावात मध्यरात्री वाघाची एंट्री; पाच शेळ्या ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शाळा परिसरातील सीसीटीव्हीत घटना कैद; वन विभागाने तात्काळ कारवाईची ग्रामस्थांची मागणी
Tiger
Tiger
Published on
Updated on

चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील गोविंदपुर गावात गुरुवारी मध्यरात्री पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून पाच शेळ्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

नागभिड तालुक्यातील गोविंदपुर गावात गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक भला मोठा पट्टेदार वाघ थेट गावात शिरल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात हा वाघ फिरताना दिसून आला. याच परिसरातील काही शेतकऱ्यांच्या घरात घुसून वाघाने पाच शेळ्यांना ठार केले, तर एक शेळी उचलून जंगलाच्या दिशेने नेल्याची दृश्य समोर आले आहे.

Tiger
Chandrapur Tiger News | चंद्रपूर–मुल मार्गावर वाघाचा थरार; शिकार केलेला बैल फरपटत नेताना महामार्ग काही काळ ठप्प

विशेष म्हणजे, शाळा परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. या फुटेजमुळे गावात वाघाचा मुक्त वावर स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे. गोविंदपुर परिसरात यापूर्वीही अनेकदा वाघाचे दर्शन झाले आहे. काही वेळा वाघाने जनावरांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला आहे, तर काही घटनांमध्ये नागरिकांवरही हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आधीच दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांमध्ये या नव्या घटनेमुळे आणखी भीती निर्माण झाली आहे.

सध्या वाघ थेट गावातच मध्यरात्रीच्या सुमारास भ्रमंती करत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. वाघाला गावात येण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गोविंदपुर गावात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news