वनवा विझवताना वनरक्षकांच्या तीन दुचाकी जळून खाक

नवरगाव-वाघडोंगर परिसरातील घटना; शासकीय कर्तव्य बजावताना अडीच लाखांचा फटका
वनवा विझवताना वनरक्षकांच्या तीन दुचाकी जळून खाक
Published on
Updated on

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव बिट परिसरात वनवा विझवण्यासाठी व्यस्त असलेल्या वनरक्षकांच्या  तीन दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. या घटना बुधवारी दुपारी घडली असून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रांतर्गत बिट क्रमांक २ मधील वाघडोंगर परिसरात बुधवारी दुपारी अचानक वनवा लागल्याची माहिती वनविभागाला मिळाली. ही माहिती मिळताच वनरक्षक सज्जन पारेकर, माधुरी सुरपाम, प्राजक्ता चौधरी आणि ओमप्रकाश चहांदे यांच्यासह पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.

वनवा नियंत्रणात आणण्यासाठी पथकाने आपल्या दुचाकी सुरक्षित अंतरावर उभ्या करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रखर उन्हाचा तडाखा आणि वाढत्या आगीच्या झळा सहन करत वनरक्षकांनी जंगल वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीचे स्वरूप अचानक भीषण झाले. वनवा विझवताना पथक आगीच्या दिशेने पुढे सरकल्याने दुचाकी ठेवलेल्या ठिकाणापासून ते दूर गेले. दरम्यान, आगीने वेग घेत दुचाकीपर्यंत धडक दिली. पथक परत येईपर्यंत तिन्ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.

या घटनेत वनरक्षक प्राजक्ता चौधरी यांची सुमारे ९० हजार रुपये किमतीची, वनरक्षक ओमप्रकाश चहांदे यांची ९० हजार रुपये किमतीची तसेच अग्नीरक्षक अमोल धुर्वे यांची अंदाजे ७० हजार रुपये किमतीची दुचाकी जळून खाक झाली. तसेच या पथकात जगदीश आत्राम, मंगलदास कुंभरे, रोशन मोहुर्ले आणि बंडू इजकापे या वनमजुरांचाही समावेश होता. वनविभागाचे कर्मचारी एका बाजूला जंगल वाचविण्याचे कर्तव्य पार पाडत असताना दुसऱ्या बाजूला त्यांची वैयक्तिक मालमत्ता आगीत नष्ट झाली. या घटनेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शासकीय कर्तव्य बजावत असताना ही हानी झाल्यामुळे संबंधित वनकर्मचाऱ्यांना वनविभागाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेनंतर उन्हाळ्यात वाढत्या वनवणव्यांच्या पार्श्वभूमीवर वनरक्षकांना अधिक सुरक्षितता साधने व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news