

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीदरम्यान मोबाईल वापरण्यावर बंदी असतानाही नियमभंग केल्याप्रकरणी वरोरा मतदारसंघाचे भाजप आमदार करण देवतळे यांच्यावर ताडोबा प्रशासनाने कारवाई केली आहे. सफारीदरम्यान मोबाईल वापरल्याचे उघड झाल्यानंतर ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व कंझर्वेशन फाउंडेशन, चंद्रपूर यांच्यावतीने त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून येथे वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटनाची शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये जंगल सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरणे अथवा जवळ बाळगणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमभंग केल्यास संबंधित पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही आहे.
दरम्यान, वरोरा मतदारसंघाचे भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा बफर क्षेत्रातील निमडेला पर्यटन गेटवरून ३० जानेवारी रोजी सपत्नीक जंगल सफारी केली होती. या सफारीदरम्यान त्यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेली एक रिल सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्या व्हिडिओमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल दिसून आल्याने सफारीदरम्यान मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले होते.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ताडोबा प्रशासनाकडून कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण सर्वसामान्य पर्यटकांकडून नियमभंग झाल्यास ताडोबा प्रशासन तत्काळ दंडात्मक कारवाई करत असते. त्यामुळे आमदारांवरही समान नियम लागू होतील का? असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व कंझर्वेशन फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने या प्रकरणाची दखल घेऊन आमदार करण देवतळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सफारीदरम्यान मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याबाबत पावती क्रमांक 190272 देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाची सुरक्षितता आणि पर्यटकांच्या शिस्तीसाठी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर प्रशासन भर देत असते.