

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रात मानवी वस्तीच्या परिसरात सतत वावर करून मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या T-91 SAM-1 या नर बछड्या वाघास अखेर वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले. 07 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी केलेल्या या कारवाईनंतर वाघास ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात सतत वावर करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 अखेर वन विभागाने यशस्वीरित्या जेरबंद केला आहे. 07 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजता ही कारवाई करण्यात आली. वाघास जेरबंद केल्यानंतर उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
यापूर्वी, 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतात काम करत असताना अमोल बबन नन्नवारे (वय 37) रा. भामडेळी यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीने या वाघास जेरबंद करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी करून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी व आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून T-91 SAM-1 या वाघास जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. वन विभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे ही मोहिम यशस्वी झाली असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.