

चंद्रपूर : ब्रिक्स देशांतील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने रविवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगल सफरीचा आनंद लुटला. या दौऱ्यात प्रतिनिधींना अनेक वाघांचे दर्शन घडल्याने त्यांनी ताडोबातील वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.
सुमारे ७० सदस्यांच्या शिष्टमंडळासाठी कोलारा, मादनापूर आणि बेलारा बफर प्रवेशद्वारांवरून २० हून अधिक सफारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. परदेशी प्रतिनिधींनी मादनापूर प्रवेशद्वारातून सफारी केली, तर इतर प्रतिनिधींनी बेलारा आणि कोलारा मार्गाने जंगल भ्रमंती केली.
सकाळच्या सफारीदरम्यान रशिया आणि इथिओपियाच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध टी-१७८ वाघ तसेच टी-८२ या वाघिणीचे एक उपप्रौढ पिल्लू दिसले. सायंकाळच्या सफारीत दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि इराणच्या प्रतिनिधींना टी-१७८, टी-८२ चे उपप्रौढ पिल्लू आणि टीएन-९ चे उपप्रौढ पिल्लू अशा तीन वाघांचे दर्शन झाले.
वाघांव्यतिरिक्त प्रतिनिधींनी चितळ, सांबर, भारतीय गवा (गौर), रानडुक्कर तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचेही निरीक्षण केले. पावसामुळे हिरवागार झालेल्या जंगलातील समृद्ध जैवविविधतेने प्रतिनिधी भारावून गेले. त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वैज्ञानिक व्यवस्थापन, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटन व्यवस्थेचे विशेष कौतुक केले.
या दौऱ्याचे नियोजन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या केले. क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला आणि उपसंचालक विशाल माळी यांनी संपूर्ण दौऱ्याचे नेतृत्व केले. त्यांना सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. दुबे, संकेत वाठोरे आणि विवेक नातू, तसेच पालसगाव व कोलारा परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रतिनिधींची सुरक्षितता, सफारीचे नियोजन आणि वन्यजीवांविषयी माहिती देण्याची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे पार पाडली.
या भेटीदरम्यान ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींना ताडोबातील अधिवास व्यवस्थापन, शिकारीविरोधी उपाययोजना, स्थानिक समुदायाच्या सहभागातून राबविण्यात येणारे संवर्धन उपक्रम यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. अनेक प्रतिनिधींनी ताडोबातील हा वन्यजीव अनुभव "अविस्मरणीय" असल्याची भावना व्यक्त केली. या भेटीमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भारतातील अग्रगण्य व्याघ्र संवर्धन केंद्र आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनस्थळ म्हणून असलेली ओळख अधिक दृढ झाल्याचे वन विभागाने नमूद केले.