

चंद्रपूर : एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नावाने जिल्ह्याची ओळख जगभर पोहोचली असताना, दुसरीकडे याच प्रकल्पाच्या जीवनवाहिनी असलेल्या अंधारी नदीचे अस्तित्व बेकायदेशीर रेती उपशामुळे धोक्यात आले आहे.
अजयपूर घाट परिसरात एका ठेकेदाराने परवानगीपेक्षा तब्बल चौपट अधिक रेतीचा उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, वनविभागाने कारवाईचा बडगा उचलला असला तरी महसूल प्रशासनाने मात्र या गंभीर प्रकारावर मौन बाळगले आहे.
अजयपूर येथील अंधारी नदी घाटातून रेती उत्खननाचा ठेका अश्विनसिंग ठाकूर नावाच्या ठेकेदाराला देण्यात आला होता. नियमांनुसार, त्याला केवळ ३ हजार ब्रास रेती उपसण्याची कायदेशीर परवानगी होती. मात्र, प्रत्यक्षात पोकलेन आणि जेसीबीसारख्या अवजड यंत्रांचा सर्रास वापर करत तब्बल १० ते १२ हजार ब्रास रेतीचा उपसा करण्यात आला. हा केवळ नियमांचे उल्लंघन नसून, नदीच्या नैसर्गिक प्रवाहासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील परिसरात हा प्रकार घडत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. १० जूननंतर रेती उत्खननावर बंदी असतानाही हे काम सुरूच होते. अखेर, या बेकायदेशीर प्रकाराची गंभीर दखल घेत वनविभागाने घटनास्थळावरून पोकलेन मशीन जप्त केली आणि संबंधित ठेकेदारावर वनगुन्हा दाखल केला आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले, तरी ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येतो, त्या महसूल विभागाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अंधारी नदीतील हा प्रकार केवळ एका घाटापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यात नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. जर प्रशासनाने, विशेषतः महसूल विभागाने, वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर केवळ नद्याच नव्हे, तर जिल्ह्याची ओळख असलेला समृद्ध वन्यजीव अधिवासही कायमचा नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.