

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने १ मे रोजी जलाशयांवर पार पडलेल्या वार्षिक मचाण गणनेत एकूण ५,७६५ वन्यप्राणी दर्शनांची नोंद झाली. कोअर आणि बफर क्षेत्रातील १६८ मचाणांवरून ही गणना करण्यात आली. यामध्ये ४२ वाघ आणि १३ बिबट्यांचे दर्शन विशेष ठरले.
बफर झोनमध्ये २१० निसर्गप्रेमी, तर कोअर झोनमध्ये २०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या आकडेवारीतून ताडोबातील समृद्ध व संतुलित वन्यजीव परिसंस्थेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वन्यप्राणी पाणवठ्यांभोवती एकत्र येतात. त्यांच्या उपस्थितीचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात ही मचाण गणना केली जाते. यंदा कोअर क्षेत्रात ९९ मचाणांवर २०१ वनकर्मचारी तैनात होते, तर बफर क्षेत्रातील ६९ मचाणांपैकी ५४ मचाण नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणीद्वारे खुले करण्यात आले होते.
या गणनेत शाकाहारी प्राण्यांची संख्या सर्वाधिक आढळली. एकूण ३,०८९ (५३.६%) दर्शन नोंदविण्यात आली. यात चितळ (१,७४५), सांबर (६२३) आणि गवा (५४७) यांचे प्रमाण लक्षणीय होते. यावरून ताडोबातील भक्ष्यसाखळी मजबूत असल्याचे स्पष्ट होते.
सर्वभक्षी प्राण्यांमध्ये माकडे व रानडुक्कर यांची एकूण १,५०० (२६%) दर्शन नोंदली गेली. तसेच ५७३ (९.९%) पक्ष्यांच्या नोंदीत भारतीय मोरांचे ५१६ दर्शन विशेष उल्लेखनीय ठरले.
मांसाहारी प्राण्यांमध्ये मोठ्या प्राण्यांचे २०९ (३.६%) आणि लहान मांसाहारींचे २१२ (३.७%) दर्शन झाले. वाघांचे ४२ (कोअर १९, बफर २३) आणि बिबट्यांचे १३ (कोअर ५, बफर ८) दर्शन नोंदले गेले. यावरून ताडोबात वाघांचे वर्चस्व अधोरेखित होते.
भेकर (८९), नीलगाय (८१), राखी लंगूर (१,०२०), रानकुत्रे (७४), अस्वल (८०), साळींदर (३७), मुंगूस (६३) यांसह विविध प्रजातींची नोंद झाली. तसेच मगरी, सिव्हेट, जंगल मांजर आणि घोरपड यांचीही उपस्थिती दिसून आली.
एकूण आकडेवारीनुसार कोअर क्षेत्रात ३,९५२ तर बफर क्षेत्रात १,८१३ दर्शनांची नोंद झाली असून एकत्रित संख्या ५,७६५ इतकी झाली आहे.
या गणनेतून मिळालेली माहिती वन्यजीवांच्या हालचाली, अधिवास आणि वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला म्हणाले, “ही आकडेवारी दीर्घकालीन वन्यजीव निरीक्षण, अधिवास व्यवस्थापन आणि संवर्धन नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”
बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात जंगलातील शांतता, पाणवठ्यांवर येणारे वन्यप्राणी आणि रात्रभर चाललेले निरीक्षण यामुळे सहभागी निसर्गप्रेमींना अविस्मरणीय अनुभव मिळाला. जनजागृती आणि वन्यजीवांबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.